#बहिष्कार की स्वयंपूर्णता

अरे भाऊ ही बायकॉट चायना काय भानगड आहे रे .....?

              अरे भाऊ , मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे फक्त एक अट आहे तो चायना नसला पाहिजे आणि मग सुरू झालं अनेक ठिकाणी पाहणी करणं ,चौकशी करणं.चायना नसलेला पण त्याच्या एवढेच बाबी ,फीचर्स ,सोयी सुविधा  समाविष्ट असलेला आणि त्याच्यापेक्षा थोडी किंमत जास्त गेली तरी चालेल पण चायना नको. आमच्यात आलेली ही अचानक राष्ट्रवादाची क्रांती एका मोठ्या आणि अगदी देशभक्त असलेल्या हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या, चीनच्या आक्रमतेला चांगल्या प्रकारे जवळून अनुभवत असलेल्या सोनम वांगचुक यांनी उभी केलेल्या मोहिमेला एक प्रकारचा पाठिंबाच होता. जवळपास आम्हाला घ्यायचा असलेला मोबाईल आम्ही शोधू लागलो तेव्हा एक गोष्ट निदर्शनास आली की, आपण किती मागे पडलो आहोत टेक्नॉलॉजी उभी करण्यात. काही ठराविक भारतीय बनावटीचे आणि त्यातही काही प्रमाणात का होईना चिनी वस्तूंचा वापर असलेला मोबाईल आम्हांला भेटला मात्र आता मुख्य अडचण आली ती त्यात असलेला फीचर्सची ,कितीही शोधाशोध केली तरी भारतीय बनावटीत त्याच्या जवळपास पोहोचेल असा मोबाईल काही मिळाला नाही आणि सरतेशेवटी आपल्याला हवा असलेला टेक्नॉलॉजीयुक्त  पैश्यातही स्वस्त दरात उपलब्ध असलेला चिनी मोबाईललाच आमची पसंती मिळाली ती केवळ हिंदी चिनी भाई भाई या नाऱ्यामुळे आणि चायनीज मोबाईल असला तरी मेक इन इंडिया आहे ओ ,ही आम्ही आमचीच घातलेल्या समजुतीवर.  शेवटी चिनी असला तरी भारतात बनवलेलाच मोबाईल घेतला भाऊ असे म्हणत आमचा राष्ट्रवाद थंडावला. जी गोष्ट मोबाईलची तीच छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून तर अगदी लहान मुलांचे कपडे ,खेळणी आणि अशाच शेकडो गोष्टींची या सगळ्यात आपला राष्ट्रवाद कसा टिकवावा ,आत्मनिर्भर भारत कसा घडवावा याचा विचार करून मन सुन्न झालं .यातून अनेकवेळ काही गोष्टींची माहिती राहून राहून मनात घर करून राहत होती. अस काय केलं चीनने की आपल्याला त्यांचा मोबाईल घ्यायला भाग पाडले किंवा दिवाळी ,दसरा ,ईद असा कोणताही सण आला की भारतीय बाजारपेठ व्यापून टाकते.
कोणाशीही स्पर्धा करायची असेल, तर त्याच्या शक्तीची , त्याच्यावर आपली असलेली अवलंबविता तपासली पाहिजे.
चीनची महती:-
महाकाय, अजस्त्र, अफाट मोठं झालेलं हे चिनी ड्रॅगन आज केवळ भारतीय बाजारपेठ काबीज करून बसलं असं नाही तर अनेक देशाशी त्याने केलेल्या व्यापाराचे मूल्य म्हणजे आज चीन जगाच्या पाठीवर एक स्वयंपूर्ण देश आहे.
या चिनी महाकाय ड्रॅगनच्या रुपाविषयी थोडक्यात माहिती अशी आहे, 1950 च्या दशकात माओच्या नेतृत्वात साम्यवादी क्रांती झाल्यानंतर पहिली जवळजवळ तीन दशके चीनने साम्यवाद शंभर टक्के अवलंबला. 1978 पर्यंत बंद दरवाजे करून व्यापारवृद्धी करत असलेला चिनी ड्रॅगनने आता 1978 पासून खुल्या बाजारपेठेचा स्वीकार करून जगापुढे त्याचं मोहकरूप घ्यायला सुरू केली.त्या आधी मागच्या 40 ते 42 वर्षात या देशाने स्वतःच्या देशात 75%पेक्षा अधिक लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले. 1980 साली असलेला 150 बिलिअन डॉलरचा व्यापार 2020 साली 14 ट्रेलिअन डॉलरपर्यंत आणला म्हणजे जवळपास 90 पट पेक्षा अधिक वाढवला. 40 बिलिअन जागतिक व्यापार असलेला 4 ट्रेलिअन म्हणजे 110 पटीपेक्षा अधिक वाढवला. 1980 साली असलेला 2% जगातिक व्यापार 2020 साली जवळपास 20% पर्यंत नेला. म्हणजे जवळपास दहा पट. ( आपला 3%) चीनचा GDP आपल्या देशाच्या 5 पट आहे.
गमतीची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या 15 वर्षात संपूर्ण युरोप खंडात बांधलेल्या घरांपेक्षा कैक जास्त घरे चीनने स्वतःच्या देशात उभारली.लाखो किलोमीटरचे गावापर्यंत जाणारे रस्ते, पाणी, वीज यांची अगदी योग्य नियोजित व्यवस्था केली, लडाख मध्ये अलीकडे एक रस्ता तयार करणारे आपण आपल्या कितीतरी आधी चायनाने अकसाई चीनमध्ये रस्त्यांचे जाळे उभे केले.जगातील सगळ्या रेल्वे पट्ट्या एकत्र केल्यातरी चीनची बरोबरी करणे अवघड आहे. जी गोष्ट रस्ते ,लोहमार्गांची तीच अजस्त्र अशा धरणांची.एकीकडे आपल्या देशात आपण शिक्षण आरोग्यावर केला जाणारा तुटपुंजा खर्च स्वातंत्र्य मिळवल्यानंतरही वाढवू शकलो नाही तर चीनने तो प्रचंड प्रमाणात केला, शिक्षणात नेत्रदीपक कामगिरी तर केली.जगात दहापैकी चार सर्वोत्तम विद्यापीठ चीनमध्ये आहेत. त्याच बरोबर क्रीडा क्षेत्रातही प्रचंड गुंतवणूक करून जगातील क्रीडा महासत्ताही होऊन दाखवले. पूर्वी आपल्या देशात शेती म्हणजे उच्च दर्जाची समजली जायची आणि नोकरी दुय्यम.आज आपल्याकडे खेड्यातून अनेक लोंढेच्या लोंढे शहराकडे केवळ नोकरीच्या आशेने येतात आणि शहरातील तुटपुंजा आणि मनमोहक दृश्यात गावपण हरवून बसतात. त्यामुळे भविष्यात शेतीवर आणि पर्यायाने वाढलेल्या तोंडाची भूक आपण भागवू शकू का ही मोठी समस्या निर्माण झाली तर आश्चर्य वाटू नये. याउलट चीनने आपली शेती अतिशय सुंदर विकसित केली, आत्मनिर्भर झाले.
सुपर पॉवर होण्याच्या मार्गावर चीनने जगावर ताबा मिळवण्याचा विचार अगदी आखीवरेखीव पद्धतीने केला, त्यात लोकशाही नसल्याने सरकारला धारेवर धरणारे कोणी नाही. कैकवर्षांपासून एकछत्री कारभार आणि सुसूत्रता याचे फलित म्हणजे चिनी ड्रॅगनच्या आज तोंडातून पडलेला हा लॉकडाउन ज्या विरुद्ध संपूर्ण जग आज केवळ पोकळ डरकाळ्या फोडून समाधान मानत आहे. याउलट आपल्या देशाकडून जर अशी चूक झाली असती तर आपल्याला कोणी माफ केले असता का यात शंका आहेच, शिवाय निर्बंध लादले असते ते वेगळे.

               आज आपल्यातील अनेकांनी 'रिमूव्ह चायना अँप' नावाचे अँप डाउनलोड करून सोनम वांगचुक यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मोबाईलमधले अनेक चिनी अँप उडवून टाकले हे खरे आहे, मात्र हे करत असताना  आपण हे तपासले का ,की या अँपचे ऑफिस जर भारतात असेल तर त्याचे काय आणि तिथे काम करत असलेल्या भारतीयांचे काय होणार आहे. व्हाट्स अँप युनिव्हर्सिटीतुन मिळालेल्या या ज्ञानाधारे आपण अँप काढले, त्यात एक उदाहरण म्हणेज TikTok काढून मित्रोन अँप वापरा सांगणारे हेच युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांना हे अँप पाकिस्तानी आहे हे माहीत नसावे ही शोकांतिका.

आपला देश आपला विकास
    मग आपण काहीच करू शकत नाही का? तर नाही असे नाही. आपण यापुढे आपल्यातील जिद्द ठेवून चिनी मालपेक्षा दर्जेदार उत्पादन कसे घेऊ शकतो, चिनी वस्तूंची मागणी कमी करण्यापेक्षा आपल्या वस्तूंची मागणी तेव्हाच वाढू शकेल जेव्हा तेवढ्याच किंमतीत अथवा थोड्या प्रमाणात कमी जास्त किमतीत आपल्या स्वदेशी बनावटीच्या वस्तू मिळू शकतील. संशोधन आणि विकासावरचा आपला खर्च वाढवायला हवा. शिक्षण आरोग्य या गोष्टींवरचा आपला खर्च वाढवून आपण 21 व्या शतकातील कौशल्ये आपल्या भावी पिढीत निर्माण केली पाहिजे.जागतिक स्तरावर चीनच्या आक्रमकतेचा सामना करण्यासाठी मित्र राष्ट्र निर्माण केले पाहिजे जी बाजू आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी चांगली धरून लावली आहे. त्याचा परिणाम कालपर्यंत कुठल्याही परिस्थितीत न नमणारा ड्रॅगन सीमारेषेवर नमला आणि थोड्या प्रमाणात का होईना मागे हटला. आपली प्रतिमा जगापुढे  अजून कशी सुधारता येईल याकडे सरकारने प्रकर्षाने लक्ष दिले पाहिजे. आता कोरोना रोग साऱ्या जगाला परिचित झाला यापुढे हा रोग कोणी पसरवला कसा पसरला याचं गुऱ्हाळ करण्यापेक्षा आता त्याला घेऊन उत्तमप्रकारे कसं जीवन जगता येईल, संधी काय आहेत याचा ठोस उपाययोजना सरकारी यंत्रणेतून करायला हवं. चायना विषयीच्या नाराजीतून संपूर्ण जगभरातील अनेक देशांनी चायना मधील उत्पादन दुसऱ्या देशात नेण्याचा विचार चालवला आहे, या संधीचा फायदा घेऊन जागतिक व्यापारात आपण मुसंडी मारली पाहिजे. भारतीय मेंदू हा सर्वोत्तम मानला जातो पण या मेंदूला येथील वातावरणात अजिबात महत्व दिले जात नाही म्हणून ब्रेन ड्रेन करून त्याचा उपयोग दुसरे देश करत आहेत. सरकारने जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनपा, ग्रामपंचायत निवडणुका जिथे प्रत्येक माणूस शोधला जातो आणि त्याला निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतले जाते. अगदी या उलट खासदार आमदार निवडणूकीत केवळ मतदानाचा टक्का आपल्या पारड्यात कसा अधिक एवढाच प्रयत्न करून निवडणूक पार पडली जाते. भ्रष्टाचार जगात सर्वत्र आहे, टक्का कमी जास्त आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याला कसं रोखता येईल सरकारी खाजगी यंत्रणांनी एकत्र येऊन कसं अजून पुढं धावता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आज अजूनही भारतात आर्थिक विषमता तफावत भयंकर वाढत चालली आहे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. सरकारी नोकऱ्यांचा विचार करता आज पगार अगदी चांगले आहेत मात्र त्यापासून हवी तेवढी उत्पादकता नाही , याचा विचार केला पाहिजे. रोजगार निर्मिती नियमित आणि पुरेशी व्हावी यासाठी प्रयत्नरत राहायला हवं. त्याआधी सरकारने प्रत्येक माणसाला त्याच्या जीवनाची हमी द्यावी म्हणजे आरोग्य सेवेबरोबर  विमेबाबत जागरूकता, दोन वेळेचे जेवण, २१ व्या शतकातील कौशल्याधारीत उत्तम दर्जेदार मोफत शिक्षण याचा पर्याय द्यावा. 3%श्रीमंतांच्या देशात 97% देशवासींयांचा विचार व्हावा. कॉर्पोरेट धनदांडगे यांच्या डोक्याचा विचार समाजाभिमुख कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. नवीन स्टार्टअपना प्रोत्साहन द्यायला हवं. आर्थिक साक्षरता वाढवली पाहिजे. मुख्य म्हणजे आपला कणा आपली भूमी, आपली शेती आज शेतकऱ्याला दरवर्षी बियाणांसाठी कर्ज घ्यावे लागते मालाला भाव मिळत नाही. अगदी रूट लेव्हलला जो कृषी सहाय्यक काम करतो त्यांचा सहभाग केवळ कागद पूर्तता करून घेण्यापेक्षा त्यांच्या कल्पना विचारात घेतले पाहिजे. प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा आणि दिशा ठरवली पाहिजे. शहरीकरण पेक्षा गावीकरण म्हणजे खेडी समृद्ध करायला पाहिजे. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असलेले नागरिक सहज वाहतूक कमी पैशात कसे करू शकतील याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. अश्या एक ना अनेक गोष्टी लक्षात घेऊन चाललं पाहिजे. मीडियाचा वापर केवळ फायद्यासाठी न करता त्याचा समाजाभिमुख कसा करता येईल याकडे लक्ष असावे.
       जागतिकीकरणाच्या या वाऱ्यात केवळ चीनी मालावर बहिष्कार घालून आपल्याच पायावर आपण कुऱ्हाड मारून घेत आहोत कारण आपण चीनला 7% निर्यात करतो तर चीन त्याच्या संपूर्ण निर्यातीपैकी 3% निर्यात आपल्या देशाला करतो.
        सरतेशेवटी सर्वश्रेष्ठ बनण्यापेक्षा उत्तम होणं कधीही चांगलं म्हणजे आपल्याला कोणाला सांगायला नको राष्ट्रवादी व्हा किंवा चायना माल बायकॉट करा....!

ए श्रीनिवास
9421200139

Comments